ओतूर (ता. जुन्नर) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ऋतुजा रामदास डुंबरे यांनी जिद्द, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर राज्यसेवेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आई-वडील शेती करत असून ग्रामीण परिस्थितीत वाढलेल्या ऋतुजा यांनी शिक्षणाची सुरुवात चैतन्य विद्यालय, ओतूर येथून दहावीपर्यंत केली. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण राप सबणीस ज्युनिअर कॉलेज, नारायणगाव येथे पूर्ण केले.कृषी क्षेत्राची आवड जोपासत त्यांनी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, पुणे येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी राज्यसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. याच काळात त्यांनी मास्टर्स इन सोशल वर्क (MSW) मध्ये पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या 2024 च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा त्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्याच वेळी सरळ सेवेतून आदिवासी विकास विभागात ‘मॉर्डन’ पदावर नियुक्ती मिळाली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेचा कठोर अभ्यास सुरू ठेवला.या अथक परिश्रमांचे फळ म्हणून कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेचे मेरिट त्यांनी क्रॅक केले. फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी मुलाखत दिली आणि महाराष्ट्रातून साधारण गटात द्वितीय क्रमांक, तसेच महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवून राज्यात मानाचा ठसा उमटवला.ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील ही यशोगाथा आज असंख्य तरुण-तरुणींना, विशेषतः मुलींना, प्रेरणा देणारी ठरत आहे.
















